पुणे : प्रतिनिधी
वडगाव शेरीच्या विकासासाठीचे घोषणापत्र महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार सुनील टिंगरे यांनी सादर केले. वडगाव शेरीला विकासाच्या शिखरावर पोहोचविणार असल्याचे टिंगरे यांनी या वेळी सांगितले. तसेच, वडगावशेरी मतदार संघासाठीसाठीचे विस्तृत 'व्हिजन' लवकरच मतदारांपर्यंत पोहोचविले जाईल, असेही टिंगरे यांनी सांगितले. टिंगरेनगर येथील तिरुपती गार्डन मंगल कार्यालयात बुधवारी दुपारी बाराच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला.
मतदार संघात नेहरू स्टेडियमच्या धर्तीवर खेळाडूंसाठी विशेष स्टेडियम तयार करणे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित शिवसृष्टी उद्यानाचे निर्माण करणे, विश्रांतवाडीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन करणे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विवाह व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी मंगल कार्यालय बांधणे, माजी सैनिकांसाठी 'माजी सैनिक भवन' कोकणी समाजासाठी 'कोकण भवन' बांधणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत मतदार संघातील गरीब जनतेसाठी घरे मिळवून देण्यासाठी मदत करणे, मतदार संघातील मुस्लिम, ख्रिश्चन व इतर सांप्रदायातील नागरिकांसाठी दफनभूमीची निर्मिती करणे, मतदारसंघात वैद्यकीय मदत केंद्र स्थापन करणे, विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी मार्गदर्शन मिळावे यासाठी युवा समुपदेशन केंद्राचा निर्मिती, रामवाडी व आळंदी या मार्गावर मेट्रो मार्गाचा विस्तार करून नगर रोड आळंदी रस्त्यावरील बीआरटी मार्ग काढून वाहतूक समस्येचे निराकरण करणे, इत्यादी प्रमुख कामे करण्याचा वादा यावेळी आमदार सुनील टिंगरे यांनी उपस्थितांसमोर केला.
हे प्रारूप स्वरूपातील घोषणापत्र असून लवकरच वडगाव शेरीसाठीचे विस्तृत 'व्हिजन' मतदारांपर्यंत पोहोचले जाणार असल्याचेही टिंगरे यांनी सांगितले. टिंगरे यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात झालेल्या कामांचा लेखाजोखाही घोषणापत्रातून मांडण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने लोहगावमधील शंभर खाटांच्या नवीन उपजिल्हा रुग्णालयाचे ५६ कोटी रुपयांचे काम पूर्ण झालेले आहे. भामा आसखेड प्रकल्पासाठी ३८० कोटी रुपयांचे काम झालेले आहे. सध्या वेगाने काम चालू असलेल्या लोहगाव पाणीपुरवठा योजनेसाठी १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मतदार संघातील ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी चाळीस कोटींचा निधी मंजूर झालेला असून त्यातील दोन कोटींची कामे पूर्ण झालेली आहेत. ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांसाठी दहा कोटी व झोपडपट्टी क्षेत्रातील नागरी सुविधांसाठी चौदा कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच, टिंगरेनगर येथील महिलांसाठी अत्याधुनिक जिमच्या निर्माणासाठी १.७० कोटी रुपयांचे काम चालू असल्याची माहिती या घोषणापत्रातून देण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाला आमदार सुनील टिंगरे, माजी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन गरुड, हवेली पंचायत समितीचे माजी सभापती अशोक खांदवे, महायुतीचे समन्वयक सतीश म्हस्के, माजी नगरसेविका शितल सावंत, महापालिकेचे स्वीकृत सदस्य चंद्रकांत जंजिरे, बंडू खांदवे, मिलिंद खांदवे, कुलदीप शर्मा, विनायक टिंगरे, किरण खेडकर, सतीश कुस्माडे, स्वप्नील पठारे आदी प्रमुख तसेच महायुतीमधील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...
Post a Comment
0 Comments