डॉक्टरच्या बंगल्यात चोरी करणाऱ्या तीन सराईतांना अटक...पुणे : सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी सिंहगड रोड परिसरातील एका डॉक्टराच्या बंगल्यात चोरी करुन ४४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
त्यामध्ये रोकड, ७८२ ग्रॅम सोने-चांदी आणि हिर्यांच्या दागिन्यांचा समावेश होता. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांसह तिघांना अटक करुन १९ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संकेत प्रकाश निवंगुणे (वय-२३ रा. बानगुडे चाळ, संघर्ष चौक, वारजे माळवाडी, पुणे), सुरज शिवाजी भरडे (वय-२४ रा. शिवसाईनगर, सुतारदरा, कोथरुड, पुणे), लक्ष्मण आण्णा जाधव (वय-३८ रा. गोसावी वस्ती, कोथरुड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रकांत मधुसूदन आठल्ये (वय- ६८, रा. आनंदनगर, सिंहगड रस्ता) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना २७ ते २८ एप्रिलच्या दरम्यान मधुरा बंगला, सफलानंद सोसायटी, संतोष हॉल जवळ, आनंदनगर येथे घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चंद्रकांत आठल्ये आणि कुटुंबीय हे सुट्टीनिमित्त बंगल्याला कुलूप लावून आपल्या शेतातील घरी मुक्कामासाठी गेले होते. चोरट्यांनी बंगल्याच्या मागील असणार्या बेडरूमच्या खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटाच्या ड्रॉव्हरचे लॉक तोडून त्यातील सोने चोरले, तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ४४ लाख १९ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता.
दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथकाची दोन पथके तयार करण्यात आली होती. आरोपींचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार देवा चव्हाण, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील यांना सिंहगड रोडवर चोरी करणारे चोरटे वडगाव येथील तुकाईनगर सर्कल येथे थांबल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.
Post a Comment
0 Comments