Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

देशाच्या ऐक्याचा विचार नसल्याने भाजपच्या आसपासही जाणार नाही...

देशाच्या ऐक्याचा विचार नसल्याने भाजपच्या आसपासही जाणार नाही...

पुणे : नेहरू - गांधी कुटुंबांने या देशाची सेवा केली आहे. देशासाठी प्राणाची आहुती दिली आहे. ते हयात नसताना पंतप्रधान त्यांच्यावर टीका करीत आहेत, हे योग्य नाही. त्यामुळे मला मोदींना एकच प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही स्वातंत्र्याच्या आगोदर किंवा नंतर गांधी घराण्याच्या एक टक्का तरी योगदान दिले आहे का?

देशात सध्या हुकूमशाहीचे चित्र असून मोदींच्या पक्षात देशाच्या ऐक्याचा विचार नाही. त्यामुळे या पक्षाच्या आसपासही जाणार नसून आम्ही त्यांनाच सत्तेतून बाहेर काढणार आहोत, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ हडपसर माळवाडीरोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते.

माजी मंत्री विश्वजीत कदम, बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार महादेव बाबर, जगन्नाथ शेवाळे, जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, तसेच समीर तुपे, प्रवीण तुपे, दिलीप तुपे, निलेश मगर, अंकुश काकडे, हेमलता मगर, योगेश ससाणे, विजय देशमुख, संजय शिंदे, अभिजीत शिवरकर आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "स्वातंत्र्यपूर्व काळात पंडित नेहरू यांना तेरा वर्षे तुरूंगवास भोगावा लागला. देशाची सेवा करताना इंदिरा गांधी व त्यांचे चिरंजीव राजीव गांधी यांची हत्या झाली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी लोकशाही प्रशासन येण्याकरिता विशेष कामगिरी केली. आता ते हयात नसताना त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीका करत आहेत, हे योग्य नाही.

यापूर्वी झालेले पंतप्रधान सभा घेताना त्यांच्या भाषणामध्ये देशाच्या विकासाचा मुद्दा असे. आतापर्यंत काय केले आणि पुढे काय करणार याबाबत सांगितले जायचे. मात्र सध्याच्या पंतप्रधानांकडे सांगण्यासारखं काही नसल्याने दहा वर्ष सत्तेवर नसलेल्या काँग्रेसवर केवळ टीका करून प्रचार करत आहेत.

राज्याची निवडणूक सात टप्प्यांमध्ये कशासाठी, इलेक्शन कमिशनचा हा निर्णय संशय निर्माण करणारा आहे. पिडीसी बँकेची शाखा रात्री उघडी राहणं हे निवडणुकीत कधी घडलं नव्हतं, ते राज्यात घडलं आहे. पंतप्रधानांना राज्यात ज्या सभा घ्याव्या लागत आहेत, त्यावरून परिस्थिती लक्षात येत आहे.

राहुल गांधींनी संपूर्ण देशाचा दौरा करून सर्व घटकातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. या देशात गांधीचा विचार रुजवला पाहिजे. विरोधात जाणाऱ्या चांगल्या लोकांना तुरुंगाची भिती दाखवली जात आहे. केजरीवालांचे काम पाहण्यासाठी बाहेरच्या देशातून लोक येत आहेत. त्यांनाही या हुकूमशाहीला सामोरे जावे लागले आहे. ही हुकूमशाही येऊ नये, असे वाटत नसेल तर मतदारांनी जागृत असले पाहिजे.

हडपसर भागाला एक सांस्कृतिक आणि वैचारिक इतिहास आहे. येथील विठ्ठल पाटील देशाच्या व राज्याच्या विकासासाठी नेहमी संघर्ष करायची तयारी असतं. ते कधीही भाजप व संघासोबत न जाता नेहमी त्यांच्यापासून दूर राहिले. दुर्दैवाने आता त्यांची पिढी सत्तेचा मलिदा कुठे मिळेल या हेतूने भाजपसोबत गेलेत. योग्य वेळ आल्यानंतर त्यांचा निर्णय घेवू.


Post a Comment

0 Comments