Type Here to Get Search Results !

New Star News India

New Star News India

पाण्यातून विषबाधा झाल्याने 9 शेळ्या, 5 मेंढ्यांचा मृत्यू...

पाण्यातून विषबाधा झाल्याने ९ शेळ्या, ५ मेंढ्यांचा मृत्यू...

पुणे : सूर्य एप्रिल पासूनच आग ओकत असून एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या मेंढ्यानी शेतातील साचलेले पाणी प्यायल्याने विषबाधा होऊन मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे यांच्या ९ शेळ्या व ५ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे.तर मलठण येथे उष्माघाताने ४ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली या दुर्दैवी घटनेने मेंढपाळांचे अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

पिंपरखेड येथील मेंढपाळ अंकुश सोमा कोकरे हे शुक्रवारी संध्याकाळी शेतात मेंढ्यांचा कळप चारत होते.दिवसभराच्या कडक उष्णतेमुळे तहानलेल्या वीस शेळ्या मेंढ्यांनी यावेळी शेजारील ऊसाच्या शेतात सरीत साचलेले पाणी पिल्यानंतर पंधरा वीस मिनिटांत ९ शेळ्या व ५ मेंढ्यांना त्रास होऊन त्या गतप्राण झाल्या.मेंढपाळ कोकरे यांनी पशुवैद्यकीय डॉ. रावसाहेब गावडे यांना तत्काळ बोलावून इतर मेंढ्यावर उपचार केले. सदर शेळ्या मेंढ्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृत्यू रासायनिक खत किंवा औषधाच्या दूषित पाण्यातून विषबाधा होऊन झाला आहे असे पिंपरखेड येथील पशुवैद्यकीय डॉ.रावसाहेब गावडे यांनी सांगितले.

दरम्यान शिरुरच्याच मलठण येथील शिंदेवाडीतील मेंढपाळ महेश भाऊसाहेब शिंदे यांच्या ४ शेळ्यांचा शुक्रवारी अचानक मृत्यू झाला.कांद्याची पात खाल्ल्याने तसेच उष्णता वाढल्याने उष्माघाताने ही घटना घडल्याचे डॉक्टर प्रकाश उचाळे यांनी सांगितले. शिरूरचे पशुसंवर्धन सहायक आयुक्त डॉक्टर नितीन पवार यांच्या सूचनेनुसार दोन्हीही घटनांची नोंद घेत पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले आहे. मेंढपाळ अंकुश कोकरे, मेंढपाळ शिंदे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments