२ महिन्यांत मालामाल होणार महापालिका नक्की काय आहे कारण...
पुणे : एप्रिल आणि मे महिन्यामध्ये निवासी मिळकतकरावर १० टक्क्यापर्यंत सूट असल्याने महापालिकेच्या तिजोरीत पैसे जमा होण्यास सुरवात झाली आहे. गेल्या २६ दिवसांत २५३ कोटी ४५ लाख रुपये जमा झाले आहेत.
या दोन महिन्यांत एक हजार कोटीपेक्षा जास्त उत्पन्न मिळेल, अशी शक्यता प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आली आहे.
पुणे महापालिकेतर्फे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात २५ हजारांपर्यंत मिळकतकर असणाऱ्या नागरिकांना १० टक्के, तर त्यापेक्षा जास्त रकमेचा मिळकतकर असल्यास ५ टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे नागरिकांकडून कर भरण्यास चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोनाच्या काळात सर्व उद्योग, बांधकाम व्यवसाय ठप्प झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नाला ओहोटी लागलेली होती. पण या कालवधीत सुद्धा पुणेकरांनी मिळकतकर भरून महापालिकेला मोठा हातभार लावला होता.
२०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मिळकतकरातून २५४९ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी निवासी मिळकतकर या दोन महिन्यांत भरणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहेत. आत्तापर्यंत ११ लाख ५० हजार नागरिकांना मिळकतकराची बिले पाठविण्यात आली आहेत. पुढील आठवड्यापर्यंत पोस्टाने हे बिल नागरिकांना मिळतील. तसेच एसएमएस, इमेलद्वारे देखील बिल पाठविण्यात आलेले आहे.
उपायुक्त माधव जगताप म्हणाले, एप्रिल आणि मे महिन्यात जास्तीत जास्त उत्पन्न मिळावे यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. २६ एप्रिल पर्यंत १ लाख ७७ हजार ४८५ नागरिकांनी २५३ कोटी ४५ लाख रुपयांचा कर महापालिकेकडे जमा केला आहे. आणखी एका महिन्यापेक्षा जास्त कालावधी शिल्लक असून, यामध्ये पुणेकरांकडून कर भरणा मोठ्या प्रमाणात होईल.
Post a Comment
0 Comments